आमची यशोगाथा
कोटमगाव खुर्द – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र
नाशिक-येवला राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं की, तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,कोटमगाव खुर्द. सुमारे २६२ लोकवस्तीचं हे गाव नारंदी नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
कोटमगाव खुर्द (येवला तालुका, नाशिक जिल्हा) येथे श्री जगदंबा माता मंदिर एक प्रसिद्ध आणि जागृत स्थान आहे. या मंदिरात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींचे स्वरूप एकरूप असलेल्या स्वयंभू, शेंदरी आणि तीन फूट उंच मूर्तीचे दर्शन होते. हे मंदिर नवसाला पावणारे असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे आणि येथे नवरात्रात विशेष उत्सव साजरा केला जातो.
इथे जवळपास सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात वादाच्या नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.उत्पन्नाचे स्रोत: श्रम शीलतेचं गाव
गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती, पैठणी आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न,वाघाड कालव्य मुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. मका,भाजीपाला ,कांदा,वेलवर्गीय पिकं, यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते. तर गावाचा पश्चिम भाग मात्र वेगळ्या वाटेवर ,तिथं औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. ही नवी दिशा गावाच्या भविष्याला नवी पहाट देणारी आहे. रोजंदारी, लघुउद्योग, प्रशिक्षण केंद्रं अशी काही स्वप्नं तिथं मूळ धरू लागली आहेत.